मुंबई : कोविड19 संदर्भात राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांना आर्थिक बळ म्हणून महावितरणच्या नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटी 17 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सुपुर्द करण्यात आला. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहायता निधीला केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले.
कोरोना विषाणूचे संकट संपविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना सुरु आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी जमा करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्यास प्रतिसाद देत महावितरणच्या नियमित 53 हजार 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एका दिवसाचे पाच कोटी 17 लाख रुपयांचे वेतन या निधीला मदत दिली आहे.
मागील वर्षी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड19 साठी सात कोटी 7 लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली होती. त्यापूर्वी 2019 मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पाच कोटी 56 लाख तसेच 2018 मध्ये केरळमधील महापूर संकट निवारणार्थ आर्थिक मदत म्हणून तीन कोटी 99 लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला; संभाजीराजे छत्रपतींचे आवाहन
- "जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते", परमबीर सिंहांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
- Pune Unlock : अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा, सोमवारपासून मॉल्स उघडणार, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार