कोल्हापूर : वीज कनेक्शन तोडल्याने अस्वस्थ झालेल्या कोल्हापुरातील संभाजीनगरमधल्या एका वीज ग्राहकाने अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिकांची आज झोप उडवली. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या परिसरातील महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन त्याने आत्महत्येचा इशारा दिला. त्यामुळे साऱ्या यंत्रणेचीच तारांबळ उडाली. सुमारे दीड तास तो इमारतीवर बसून होता. अखेर घरातील वीज जोडणी पूर्ववत झाल्यानंतर तो इमारतीवरुन खाली उतरला.


संभाजीनगरातील हा ग्राहक रिक्षा व्यावसायिक आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थकित वीज बिलापोटी आज त्याच्या घरातील वीज कनेक्शन तोडले. त्याचा राग मनात धरुन तो वीज बिल भरणा केंद्रात आला. पण वीज बिल भरणा केंद्र आज दुपारपर्यंत सुरु असल्याने त्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या केंद्रातील अधिकारी काम आटोपून निघून गेल्याने तेथे कोणीच नव्हते. त्यामुळे त्याच्या संतापाचा पारा चढला. तो थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेला. तिथल्या कठड्यावर बसून त्याने महावितरणविरुद्ध खदखद व्यक्त करायला सुरुवात केली. परिसरातील नागरिकांनी त्याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला इमारतीवरुन खाली येण्याची विनंती केली. मात्र, त्याने "माझी दहा हजार रुपयांची नोकरी गेली आहे. मी बिल भरायला तयार आहे. महावितरणने मला सवलत द्यायला हवी होती. रिक्षा व्यवसायात पैसा मिळत नाही. बिल भरणार कुठून?" असा प्रश्न उपस्थित केला.


या ठिकाणी पोलीस कर्मचारीही आले. त्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. "महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी केली आहे. घरी मोबाईल करुन त्याची माहिती घ्या," असे त्याला सांगितले. अखेर वीज जोडणी झाल्यानंतर त्याचा राग कमी झाला आणि तो इमारतीवरुन खाली आला. तो खाली आल्यानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.


चार मजली इमारतीवरुन खाली आल्यानंतर जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. आधी पोलिसांसोबत जाण्यास तयार नसलेला हा इसम नंतर पोलिसांच्या सोबत पोलीस ठाण्यात गेला. मात्र माझी व्यथा काय आहे ते ऐकून घ्या, अशा पद्धतीची विनवणी तो सारखा करत राहिला.