मुंबई :  29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणारी नियोजित म्हाडा (Mhada Exam) सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22  पुढे ढकलण्यात आली आहे. आज एमपीएससीमार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 


म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 


परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील.


मागच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी होणार होती. परंतु एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी म्हणजे 29 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार होत्या. यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले होते. त्यामुळेच आता म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकरण्यात आलेली परीक्षा फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळल्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून अनेक विद्यार्थ्यांनी मंत्री आव्हाड यांना टॅग करून "आमची गैरसोय टाळल्याबद्दल आभारी आहोत, धन्यवाद अशा पोस्ट केल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या