मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. कोविडचे संकट असले तरी कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करत एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी करून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे." अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, "MPSC ची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत आहे. त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परीक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक आणि मानसिक अडचण होणार आहे."


"तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल तसेच वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत आहे. इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर होताच, काही राजकीय पक्षाचे लोक त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे एक आमदार या परीक्षा ठरल्याप्रमाणेच झाल्या पाहिजेत असे म्हणत असताना दुसरे आमदार मात्र परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न असतानाही भारतीय जनता पक्ष वेगवेगळी मतं मांडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा.", अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 


MPSC Exam Postponed | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली


रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु : सूत्र


कोरोनामुळं एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या MPSC च्या निर्णयामुळे सरकारविरोधात रोष निर्माण झालं आहे. पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं आहे. MPSC ने सरकारशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली


राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :