मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली.
राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल - मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.