Maharashtra Cabinet Expansion : तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) मंत्री मंडळाचा विस्तार पार पडला. शिंदे गटातील नऊ व भाजपमधील नऊ अशा अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (Cabinet Minister) शपथ घेतली. यात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप मिळाले, मात्र नाशिक (Nashik) भाजपला या मंत्रिमंडळात हुलकावणी दिल्याने भाजप आमदारांचा (BJP MLA) नाराजीचा सूर आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये पहिल्या टप्प्यात अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जण मंत्री झाले आहेत. त्यातच नाशिकमधील शिंदे गटात असणारे शिवसनेच्या दोन आमदारांपैकी एकाला मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नाशिक भाजप काहीसे नाराज असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान शिंदे गटात मालेगाव बाह्यचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि नांदगांवचे सुहास कांदे (Suhas Kande) हे सामील आहेत. तर नाशिकमध्ये डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले असे भाजपचे पाच आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे जड आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदाराला मंत्री मंडळात संधी दिल्याने भाजप आमदाराना डावलण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
तसेच मंत्री मंडळ होणार हे निश्चित झाल्यानंतर एका महिला आमदाराला संधी मिळणार अशी आशा होती. त्यामुळे नाशिकच्या सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांची नावे चर्चेत होती. मात्र शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला स्थान नसल्याने पुरुषप्रधान मंत्रिमंडळ झाल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.
महिला आमदाराला संधी?
तर शिंदे फडणवीस सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळात एका महिलेचा समावेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार नाशिकमधून आमदार देवयानी फरांदे यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांनाही डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.