औरंगाबाद : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' योजनेचा एक अजब कारभार पहायला मिळत आहे. विद्यापीठाने एमफील, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात खुरुप दिला आहे. या विद्यार्थ्यांकडून आमराई खुरपून घेतली जाते. मराठवाड्याच्या गावागावातून उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेली गोरगरीब मुलं-मुली खुरपणी करत असताना, विद्यापीठाला कसलंच सोयरसुतक नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खुरपणी करणाऱ्या तरुणींपैकी कोणी एमएससीचं शिक्षण घेत आहे, तर कोणी एमएचं. कोणी एमफिल करत आहे, तर कोणी पीएचडी. यांच्यावर खुरपणी करण्याची वेळ का आली? 'कमवा आणि शिका' नावाच्या योजनेअंतर्गत या मुलींना आमराईत खुरपणीला विद्यापीठाने जुंपलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्यातील गोरगरीब विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात. घरच्या गरीबीमुळे पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी कमवा आणि शिका योजनेत काम करुन शिकतात. गावात आई-वडील इतरांच्या शेतात खुरपणी करतात. त्यांच्या हातातील खुरपं काढण्याची स्वप्न उराशी बाळगून उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या या विद्यार्थ्यांच्या हाती इथल्या विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा खुरपं दिलं.
1978-79 ला 'बामु'मध्ये कमवा आणि शिका योजना सुरु झाली. या योजनेत खरंतर मुला-मुलींना कुशल काम देणं गरजेचं आहे, मात्र इथे विद्यापीठ आमराईतलं गवत काढायला लावतं. खरंतर आता या मुलींची परीक्षा आहे. खुरपणीमुळे यांच्या हातांना जखमा झाल्यात, अशा जखमा घेऊन या पोरी परीक्षा देतात आणि विद्यापीठ महिन्याकाठी कमवा शिकवा योजनेअंतर्गत मुलींच्या हाती 1900 रुपये देतात.
विद्यापीठ प्रशासनाने मनात आणलं, तर या विद्यार्थ्यांना क्लेरिकल काम देता येतील. भविष्यात त्यांना याचाही फायदा होईल. पण हे विद्यापीठ बदलायला तयार नाही. निदान आता तरी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून थोडं शिकायला हवं. तरच 'कमवा आणि शिका' या योजनेचा खरा लाभ या गोरगरीबांना होईल, अन्यथा त्यांचीही थट्टाच ठरेल.
'बामु' विद्यापीठातील आमराईत एमफिल-पीएचडी विद्यार्थ्यांची खुरपणी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
29 Oct 2018 06:50 PM (IST)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये 'कमवा आणि शिका' नावाच्या योजनेअंतर्गत एमफिल-पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमराईत खुरपणीला जुंपण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -