Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्मार्ट सिटीच्या बसमधून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर बसच्या कंडक्टरने अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. एवढंच नाही तर पीडित मुलीचा हात धरून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तसेच सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. शेवटी तरुणीने आरडाओरडा करत बस थांबवली आणि आपली सुटका करून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 वर्षीय पीडित मुलगी कॉमर्स शाखेच्या पहिल्या वर्षात शिकते. महाविद्यालयात जाण्यासाठी ती रोज आपल्या मैत्रिणींबरोबर स्मार्ट सिटीच्या बसमधून प्रवास करायची. दरम्यान, 13 एप्रिल रोजी देखील महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी ती सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. यावेळी बसमध्ये चालक, कंडक्टर वगळता तीन प्रवासी होते. त्या दिवशी तिच्यासोबत मैत्रिणीही नव्हत्या. पीडित मुलगी बसमध्ये बसताच बसच्या कंडक्टरने तिच्याकडून तिकिटाचे पैसे घेतले. मात्र तिला तिकीट न देता रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणींविषयी विचारपूस सुरू केली. इतर प्रवाशांना तिकीट दिल्यावर कंडक्टर तिच्याजवळ गेला आणि तिने बाजूच्या सीटवर ठेवलेली बॅग उचलून तिच्या शेजारी जाऊन बसला.
कंडक्टरचं वागणं असह्य झाल्यानं मुलीचा तिथून निघण्याचा प्रयत्न, मात्र...
दरम्यान बस थांब्यावर थांबताच कंडक्टरने बसमधून उतरणाऱ्या प्रवाशाला आमच्यासाठी समोरील दुकानात आईस्क्रीम द्या, असं म्हटले. कंडक्टरचं विचित्रपणे वागणे पाहून मुलगी घाबरली आणि तिने आईस्क्रीमला नकार दिला. दरम्यान, त्यानंतर कंडक्टरने मुलीकडे मोबाईल क्रमांक मागितला. पण तिने नंबर देण्यास नकार देताच, तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यावर आपला नंबर डायल केला. तसेच खाली उतरल्यावर तू थोडा वेळ इथेच थांब, मी लगेच परत येतो असंही म्हणाला. कंडक्टरचं वागणं असह्य झाल्याने मुलीने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिचा हात धरला. त्यामुळे मुलीने आरडाओरडा सुरु केला आणि बस थांबली. बस थांबताच मुलगी तत्काळ त्यातून उतरली. तसेच घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच सिडको पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. तर स्मार्ट सिटी बस प्रशासनला याबाबत कळताच त्यांनी, संबंधित कंडक्टरला सेवेतून काढून टाकलं असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :