गोंदिया : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही सरकार ऐकत नसल्याने अस्वस्थ झालेले खासदार नाना पाटोले यांनी एका महिन्यापासून सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींवरुन त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

पेट्रोलची मूळ किंमत 31 रुपये असताना ग्राहकांकडून 79 रुपये का वसूल केले जातात, याचा जाब पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विचारणार असल्याचं नाना पटोले म्हणाले. शिवाय वेळ पडल्यास लोकसभेतही हा प्रश्न उपस्थित करु असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र तुडुंब, पण पेट्रोलवर 11 रुपये दुष्काळ कर

उजनी धरण भरलं आहे, तर चंद्रभागा दुधडी भरुन वाहत आहे. कधी नाही ते मराठवाड्यातील जायकवाडी तुडुंब आहे. पण सरकारच्या लेखी मात्र महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळेच तुमच्याकडून 1 लिटर पेट्रोलमागे तब्बल  11 रुपयांचा दुष्काळ कर घेतला जात आहे.

(( पेट्रोलचे सरासरी दर 75 – 11 दुष्काळ कर  = 64 ))

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या नावाखाली सरकार तुमचा आमचा खिसा कापत आहे. राज्यात सध्या सरासरी 75 रुपये लिटरने पेट्रोल मिळतं. यातील 11 रुपये कमी झाले तर फक्त 64 रुपयाने तुम्हाला पेट्रोल मिळू शकेल. त्यामुळे 11 रुपयांनी जरी पेट्रोलचे दर स्वस्त झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल.