औरंगाबाद/नाशिक : एकीकडे घरांच्या किंमत वाढल्यात तर दुसरीकडे इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा गाठला आहे. राज्यात पेट्रोलचे दर तुलनेत जास्त आहेत. त्याचं कारण म्हणजे सरकारने सुरु केलेला दुष्काळ कर. यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती नाही, तरीही दुष्काळ कर का वसूल केला जातोय, असा प्रश्न आहे.


उजनी धरण भरलं आहे, तर चंद्रभागा दुधडी भरुन वाहत आहे. कधी नाही ते मराठवाड्यातील जायकवाडी तुडुंब आहे. पण सरकारच्या लेखी मात्र महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळेच तुमच्याकडून 1 लिटर पेट्रोलमागे तब्बल  11 रुपयांचा दुष्काळ कर घेतला जात आहे.

(( पेट्रोलचे सरासरी दर 75 - 11 दुष्काळ कर  = 64 ))

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या नावाखाली सरकार तुमचा आमचा खिसा कापत आहे. राज्यात सध्या सरासरी 75 रुपये लिटरने पेट्रोल मिळतं. यातील 11 रुपये कमी झाले तर फक्त 64 रुपयाने तुम्हाला पेट्रोल मिळू शकेल. त्यामुळे 11 रुपयांनी जरी पेट्रोलचे दर स्वस्त झाले तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल.

विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकारने पेट्रोलवर कर लावून नुकसान भरुन काढलं.  लोकांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला साथ दिली. पण आता दुष्काळ नसतानाही सरकार लोकांची लूट का करतंय, असा प्रश्न आहे.

विरोधात असताना पेट्रोल एका रुपयानेही वाढलं की फडणवीस बैलगाडी घेऊन आंदोलन करायचे. तर पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी दिल्लीवर निशाणा साधायचे. आता क्रूड ऑईलच्या दरांनी तळ गाठला असतानाही ही लूट लोकांनी का सहन करायची? असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपच्या शब्दात सांगायचं झालं तर 'जनता माफ करणार नाही'!