Weather Update: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. आज पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) दिला आहे. आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे (Pune) जिल्ह्याला देखील आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पुण्यातही घाटमाथ्यावरील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर, इतर ठिकाणी मध्यम पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.


या आठवड्याच्या सुरूवातीला राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुणे शहरासह घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसर क्षेत्रात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली.  राज्यातील धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे (Pune Rain) जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस होत असून पूर्व भागात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. परिसरात भात लागवडीला मोठी वेग आला आहे.


मुंबई शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू 



मुंबई शहरासह (Mumbai Rain) पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळे अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरला आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी भरायला सुरुवात झाला आहे.अंधेरी सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यासोबत पोलीस आणि पालिकेचा लाईफ गार्ड यांचा अंधेरी सबवे बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


राज्यात रेड, ऑरेंज अलर्ट कुठे?


नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर आज अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे, तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये उद्या (ता. 19) दोन दिवस 'रेड अलर्ट' आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, त्यामुळे 'यलो अलर्ट' दिला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


आज कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता 



हवामान विभागाकडून (IMD) रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.