Weather Monsoon News : राज्यातून नैऋत्य मान्सून (Monsoon) आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात   मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) एबीपी माझाला महत्त्वाची माहिती दिली आहे.  धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव भागातून मान्सून माघारी फिरण्यास पुढील  दोन ते तीन दिवसात अनुकूल वातावरण  आहे. 


राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार  आहे. 


राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट


राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.  5 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परत जातो. उर्वरित राज्यातून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच  परत गेलेला असतो. 1975 ते 2022 या कालावधीत  आतापर्यंत मान्सून परतीच्या तारखांवर नजर मारल्यास लक्षात येते की, 2005 साली 2 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानतंर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे मान्सूनच्या आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविधता दिसून येते.


मान्सून परतीचा प्रवास नेमका काय?


जून  ते सप्टेंबर या कालावधीत जेव्हा भारतात मान्सून सक्रिय असतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारच्या वाऱ्यांमध्ये युद्ध पाहायला मिळते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये कोरडी हवा असते. तर याउलट बंगालचा उपसागर, अरबी समुद्र किनारपट्टी भागातील हवेत आद्रता असते. भारतावर या दोन वाऱ्यांमध्ये युद्ध सुरू असते त्यामध्ये कोणते वारे हे अधिक शक्तिशाली आणि प्रभावी आहे त्यावर मान्सून कसा असणार हे निश्चित होते. याचे उदाहरण द्याचे झाले तर ऑगस्ट 2023 मध्ये जो पाऊस पडला तो 1901 पासूनच्या ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता सर्वात कमी पाऊस या वर्शी पाहायला मिळाला. दोन पावसाचे खंड ऑगस्टमध्ये पाहायला मिळाले.  पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणमध्ये मोठ्या प्रमाणात कोरडी हवा भारतात आली होते. परिणामी या वाऱ्याचा परिणाम पावसावर झाला. 15 सप्टेंबर किंवा शेवटच्आ आठवडा पाहिला तर मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावतो. ज्यामुळे कोरडी हवा भारतात येते. जशी कोरडी हवा भारतात येते तसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.