नांदेड : शहरातील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आज पुन्हा 7 रुग्णांचा याच रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेवरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तर, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. “मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय. हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट, असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 


नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश आहे. काल 24  आणि आज 7 मृत्यू झाले. ज्यामध्ये 16 निष्पाप बालकांचा समावेश आहे. आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान. कितीवेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे?, आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देताय. आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघतायत आणि तरीही इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय?, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 


मंत्र्यांनी राजीनामा द्यावा...


मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे "हत्यारे सरकार" आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून म्हटले आहे. 


राहुल गांधींनी घेतली दखल...


दरम्यान नांदेड येथील घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे."नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार हजारो कोटी रुपये प्रचारावर खर्च करते. पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही." असे राहुल गांधी म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Government Hospital Incident : मृत्यूचं तांडव सुरुच! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट