नांदेड : नांदेड (Nanded) शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती आता रुग्णालयात चौकशी करणार आहे. चौकशी समिती येणार आहे म्हणून आता शासकीय रुग्णालय प्रशासन अलर्टवर आहे. ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून (Sharad Pawar) ते काँग्रेस नेते राहुल गांधीनी (Rahul Gandhi) सरकारवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 24 निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.


प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 24 निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली. 24 जिवामध्ये 12 नवजात बाळाचा समावेश आहे हे ऐकून मी आणि माझी पत्नी निशब्द झालो आहे, 


12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू होणं दु:खद : राहुल गांधी


 या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.  एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. औषधांअभावी 12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू होणं दु:खद आहे. भाजप सरकार हजारो कोटी रुपये आपल्या प्रचारावर खर्च करत आहे. पण मुलांच्या औषधासाठी पैसे नाहीत, नांदेड घटनेवर शोक व्यक्त करत राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.   


मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना : शरद पवार


नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेंच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले. 


रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंचे सरकारवर गंभीर आरोप


नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील घटनेवर आमदार रोहित पवारांनी  प्रतिक्रिया दिली आहे.  या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तर हे मृत्यू निष्काळजीपणामुळे झाले असतील तर त्याची जबाबदारी या विभागाचे मंत्री घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. तर हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळेच राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले,  वेळेवर औषध पुरवठा न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला.  हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळेच राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. मुंबईत देखील अनेक सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमधे औषधांची हीच परिस्थिती आहे.  त्याचे परिणाम राज्यभरातल्या निष्पाप जनतेला भोगावे लागत आहेत.


हे ही वाचा :


Nanded Government Hospital Incident : मृत्यूचं तांडव सुरुच! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट