Monsoon News : मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील 48 तासात नैऋत्य वारे पुढे सरकणार असून केरळात मान्सून 27 मे रोजी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. 


 गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे. त्यामुळे पुढच्या टप्याचा प्रवास खोळंबला आहे. मागील आठवड्यात केरळात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडला. सध्या केरळात पावसाची विश्रांती आहे. पुढील काही तासात नैऋत्य वारे पुढे सरकणार असून केरळात मान्सून 27 मे रोजी दाखल होणार आहे. त्यामुळे यंदा सकारात्मक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 


महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. विदर्भात आजपासून पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानी हजेरी लावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज चंद्रपुरात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं  जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. पंढरपूर परिसरात वादळी वारे आणि पावसाने द्राक्ष बेदाणे शेड उध्वस्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तर शेवग्याची झाडे पडली आहेत. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे व कागद उडाल्याने सहा लाख रुपयांच्या तीन टन बेदाण्याचे नुकसान झाले आहे. तर पळशी‌ येथील शेतकरी शेवाळे यांची दोन‌ एकरावरील शेवग्याची बाग‌ जमिनदोस्त झाली आहे


संबंधित बातम्या :  


Monsoon News : अरबी समुद्रात मान्सून दाखल, 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज 


Monsoon News : मान्सून अडकला श्रीलंकेच्या वेशीवर, 27 मे पर्यंतचा भारतात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हुकणार?