मुंबई : अवघा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाटत पाहत होता तो मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. येत्या चार दिवसांमध्ये मान्सून इतर महाराष्ट्रात देखील सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


मान्सूनची राज्यातील दक्षिण कोकण किनारपट्टीवर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात एन्ट्री झाली आहे. पूर्व विदर्भात मात्र मान्सूनचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 22 आणि 23 जूनला कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


दरम्यान नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.



गोव्यातही मान्सून दाखल


दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, कर्नाटक मार्गे गोव्यात येणारा मान्सून यंदा तब्बल 2 आठवड्यानंतर गोव्यात दाखल झाला आहे. गोवा वेधशाळेने याची अधिकृत घोषणा केली आहे. गोव्यात आज दाखल झाल्यानंतर मान्सूनने आपली वाटचाल कायम राखत महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि कोल्हापूरचा टप्पा ओलांडला. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील वेधशाळेने दिला आहे.


दरम्यानच्या काळात आलेल्या वायू चक्रीवादळाने मान्सूनच्या पुढे सरकण्यासाठी तयार झालेले पोषक वातावरण विस्कटून टाकले होते. वातावरणातील आद्रता वायू सोबत निघून गेल्याने मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर पडले होते. काल पासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूनचं आज आगमन झालं.


गोव्यात मान्सून दोन आठवडे उशिरा दाखल झाला असला तरी उर्वरित दिवसात पाऊस दरवर्षीची सरासरी भरून काढेल. गेल्या 20 वर्षात प्रथमच मान्सूनच्या आगमनास इतका विलंब झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितलं.