पुणे : पुण्यात आजपासून सर्व मॉल्स आणि मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने शहरातील सर्व मॉल आणि मल्टिप्लेक्सना नोटीस बजावून तशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र पहिल्या दिवशी बहुतांश ठिकाणी या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे.


गेल्या आठवड्यात पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मॉलमध्ये पार्किंग शुल्काच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी पार्किंग नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पार्किंग निःशुल्क करण्याचा निर्णय राबवण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने एक आठवडा घेतला.

पार्किंग शुल्क आकारणाऱ्या मॉल व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तासानुसार किंवा वाहनाच्या स्वरुपानुसार भरमसाठ पार्किंग शुल्क आकारले जात असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होते. बेकायदा शुल्क आकारणी टाळण्यासाठी मोफत पार्किंगचा पर्याय सुचवण्यात आला आहे.

पुणे शहरात सध्या 40 मॉल्स आणि मल्टिप्लेक्स असून तिथे वीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पार्किंग मोफत झाल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल.

सध्या तरी हा निर्णय फक्त कागदावरच राहिल्याचं दिसून येत आहे. कारण प्रत्यक्षात अनेक मॉल आणि मल्टिप्लेक्समधे वाहनांच्या पार्किंगसाठी अजूनही पैसे घेतले जात असल्याचं दिसून येत आहे. दिवसभरात शहरात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे पहावं लागणार आहे.