सातारा : सातारा आणि सांगली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का 4.8, तर दुसरा 3.5 रिश्टर स्केल क्षमतेचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण असलं तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भूकंपाचा धक्‍का जाणवताच स्थानिक घराबाहेर पळाले. भूकंपाचे धक्के सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात जाणवले. भूकंपाचा कालावधी कमी असल्यामुळे त्याची तीव्रता जाणवली नाही.

जवळपास तीन धक्क्यांनी सांगलीतील चांदोलीचा भाग हादरला. सलग तीन धक्के बसल्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले होते.
चांदोली परिसरात सकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल नोंदली गेली.

त्यानंतर लगेचच म्हणजे दोन मिनिटांच्या फरकाने 7 वाजून 47 मिनिटांचे सुमारास पुन्हा याहून मोठा 3.8 रिश्टर स्केलचा धक्का बसला.
8 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास 2.9 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या वर्षात सलग तीन धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे.