Monkeypox : कोरोना महामारीनंतर (Covid 19) आता मंकीपॉक्स विषाणूचा जगभरात उद्रेक होताना दिसतोय. जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. आधीच कोरोना महामारीसोबत लढा सुरु असताना या नव्या संकटामुळे देशाची चिंता वाढली आहे. यामध्येच महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह आले आहेत. राज्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एन.आय व्ही. पुणे आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी 11 नमुने एन आय व्ही. पुणे येथे तर 6 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानुसार हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
एन.आय.व्ही पुण्यासह आता मंकीपॉक्स निदानाची सोय आता राज्यातील आणखी दोन प्रयोगशाळा मध्ये झाली आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( एम्स) नागपूर यांचा समावेश झाला आहे. राज्यात आता तीन ठिकाणी मंकीपॉक्सचं निदान होणार आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
महत्वाच्या बातम्या :
- Monkeypox Virus : देशात मंकीपॉक्सचा वाढता धोका, संरक्षणासाठी काय करावं? केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
- Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 2024 नव्या कोरोन रुग्णांची नोंद, 5 जणांचा मृत्यू
- Health Tips : स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना कशी काळजी घ्याल? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार