मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करावयाच्या सहा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांनी खरेदी करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालविकास विभागात 106 कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

राज्यातील एक लाख वीस हजार अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी ॲन्ड्राईड बेस्ड मोबाईल फोन खरेदी करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने 28 फेब्रुवारी, 2019 रोजी घेऊन तशा प्रकारचा शासन आदेश काढला होता. मे. सिस्टेक आयटी सोल्यूशन प्रा.लि. या पुरवठा दारांकडून पॅनॉसानिक ईलुगा आय-सेव्हन या कंपनीचे मोबाईल फोन प्रत्येकी आठ हजार आठशे सत्याहत्तर याप्रमाणे खरेदी करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.  त्यासाठी विभाग 106 कोटी 82 लाख 13 हजार 795 रुपये खर्च करणार आहे.  मात्र या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मंत्रालयासमोरील त्यांच्या बी-4 या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी किरकोळ ऑनलाईन बाजारात हा फोन सहा हजार ते साडे सहा हजार रुपयांमध्ये उपलब्ध असतांना विभागाने मात्र घाऊक किंमतीत एक लाख वीस हजार मोबाईल खरेदी करतांना त्यापेक्षा कमी किंमतीने खरेदी करण्याची आवश्यकता असतांना आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांना खरेदी करुन हा भ्रष्टाचार केला असल्याचा दावा केला आहे.

सदर पुरवठादार कंपनीने या मोबाईलची किंमत आठ हजार आठशे सत्त्याहत्तर पेक्षा कमी करणार नसल्याचे कळविल्यानंतरही याच पुरवठा दाराकडून खरेदी का केली? याच किंमतीत यापेक्षा चांगल्या स्पेसिफिकेशनचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल बाजारात उपलब्ध असतांना बाजारात उपलब्ध न होणारी आणि बंद पडलेल्या कंपनीचे मोबाईल का खरेदी केले? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

हा मोबाईल सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाही.  त्याचे उत्पादन कंपनीने चार महिन्यापूर्वीच बंद केलेले असताना कंपनीचा जुना माल विक्री करण्यासाठी विशिष्ठ पुरवठादाराला मदत करण्यासाठीच सरकारचे 106 कोटी रुपये उधळले असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्या कंपनीला हे 106 कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपीटल फक्त 5 कोटी 50 लाख आणि पेड अप कॅपीटल केवळ 4 कोटी 92 लाख 65 हजार इतके असल्याकडेही धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले आहे.

यापूर्वी देखील विभागाने मोबाईल खरेदी करीत असतांना अनाकलनीयरित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊनही पुन्हा अशाच प्रकारे खरेदी होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.  या मोबाईलच्या खरेदीच्या निर्णयात तातडीने स्थगिती देऊन या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या स्मार्टफोनची किंमत ही सॉफ्टवेअर, डाटा कार्ड आदी साहित्यासह - महिला आणि बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट फोनच्या खरेदीसंदर्भात विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने विविध वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. स्मार्ट फोनची बाजारभावापेक्षा अधिक किमतीने खरेदी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वास्तविक पाहता या स्मार्ट फोनसोबत मुलांची पोषणविषयक माहिती अपलोड करण्यासाठी मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, 32 जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली किंमत ही फक्त स्मार्टफोनची नसून ती या सर्व साहित्यांची एकत्रीत किंमत आहे, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

पोषणासंदर्भातील माहिती जलदगतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीची सर्व प्रक्रिया ही जीईएम पोर्टलवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली असून त्यानंतर शासनाची राज्यस्तरीय खरेदी समिती आणि उच्च अधिकार समितीच्या मान्यतेने एल 1 निविदाधारकास  स्मार्ट फोन पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंगणवाडी सेविकांना माहिती अपलोड करण्यासाठी Eluga I7 या स्मार्टफोनच्या एन्टरप्राईज इडिशनची खरेदी केली जाणार आहे. मूळ Eluga I7 या स्मार्टफोनच्या तुलनेत  एन्टरप्राईज  इडिशन असलेल्या स्मार्टफोनची क्षमता, प्रोसेसर स्पीड अधिक आहे. ऑपरेशन सिस्टीमही अत्याधूनिक आहे. याशिवाय वॉरंटी कालावधीही अधिक असून सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशल सर्व्हीस सपोर्ट दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अंगणवाडीतील बालकांची तसेच पोषणाची माहिती अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर, माहीती संकलीत करण्यासाठी 32 जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी  साहित्याचा त्यात समावेश आहे. या सर्व साहित्यासह स्मार्टफोनच्या किंमतीस निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकूण स्मार्टफोनच्या 5 टक्के अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) यानुसार 5 हजार 100 एवढे स्मार्टफोन अतिरिक्त घेण्यात आलेले आहेत, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.  वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन प्रसिद्धी माध्यमांमध्ये अर्धवट माहिती प्रसारित करण्यात आली आहे, असे विभागाने स्षष्ट केले आहे.