सोलापूर : गेल्या 70 ते 75 दिवस बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत. सम-विषम किंवा एकदिवसाआड दुकाने सुरु करण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्यात. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मोबाईल मार्केटला काही प्रमाणात अच्छे दिन आले आहेत.


लॉकडाऊनमध्ये अनेक शाळांनी ऑनलाईन लर्निंगचे धडे देण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे कंपन्यामध्ये देखील वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी स्मार्टफोनचा वापर केला. मोबाईलचा अतिवापर, तापमानमुळे मोबाईलमध्ये झालेल बिघाड, हेडफोन, चार्जर साऱख्या एक्सेसिरिज खरेदी या सर्वांमुळे सोलापुरातील प्रसिद्ध अशी मोबाईल गल्ली सध्या ग्राहकांनी गजबजली आहे. खराब मोबाईल दुरुस्त करणे किंवा नवीन मोबाईल, टॅब खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच वर्दळ सध्या या बाजारात दिसतेय.


सोलापूर शहारात जवळपास 150 मोबाईल विक्रीची दुकानं आहेत. या रिटेल शॉप्समधून दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होत असते. लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनंतर सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मोबाईल रिटेलर असोशिएशनचे अध्यक्ष महेश चिंचोळी यांनी दिली. मात्र बऱ्याच ग्राहकांना स्टॉक कमी असल्याने घरी परतावे लागत असल्याचेही विक्रेते सांगत आहेत. लॉकडाऊनमुळे मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे मोबाईल उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात ग्राहकांची मोठी मागणी असताना देखील स्टॉक नसल्याने परिणाम झाल्याची माहिती मोबाईल विक्रेते संजय फाटे यांनी दिली.


लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. मात्र काही कंपनीनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. अद्यापही सोलापुरातील परिस्थिती पाहता व्यवहार पूर्णपणे सुरु होतील असे वाटत नाही. त्यामुळे अनेकजण मोबाईल विक्री सुरु होताच खरेदीसाठी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनमध्ये मोबाईल खराब झाल्यानंतर सर्व्हिस सेंटर बंद होते. त्यामुळे आता नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रिया मोबाईल खरेदी करण्यासाठी आलेल्या संभाजी शेळके यांनी दिली.


केंद्र सरकाने वाढवलेल्या जीएसटीमुळे मोबाईलच्या दरात देखील फरक पडला आहे. याआधी मोबाईलवर 12 टक्के जीएसटी होता, तो वाढवून 18 टक्के करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून मोबाईलच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद होते. त्यामुळे सरकारने करांच्या रकमेत कपात करावी अशी मागणी मोबाईल विक्रेते राज सलगर यांनी केली. दरम्यान मोबाईल गल्लीत वाढणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे मोबाईल गल्ली नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. परिसरात कोणतेही वाहन आणण्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आहे. मात्र लोकांनी बॅरिकेडिंग हटवून वाहनं बाजारात आणल्याने मोठी गर्दी होतेय. ही गर्दी हटवण्यासाठी मात्र पोलिसांना कसरत करावी लागत आहे.


Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट