Bharat Jodo yatra :  काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली. राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज जाहीर सभा उधळून लावण्याची इशारा देण्यात आला होता. पण पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मनसेचा हा प्लॅन फसला आहे. 


शेगावातील राहुल गांधीची सभा उधळून द्यायला निघालेल्या मनसेच्या शंभरवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेगावपासून दहा किलोमीटरवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील लोहारा येथे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळेंसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचा गनिमीकाव्याने शेगावमध्ये शिरण्याचा प्रयत्न होताय. मात्र, लोहारा येथील प्रचंड पोलीस बंदोबस्तामूळे मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय. यावेळी या ठिकाणी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावातली सभा उधळण्याच्या इराद्यानं बुलढाण्यात दाखल झालेल्या मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतलं आहे. मनसेच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आधी चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आलं आणि मग त्यांची रवानगी जिल्ह्याबाहेर करण्यात आली.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची शेगावातली सभा उधळण्याचा इशारा मनसेनं दिला होता. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन आणि सुमीत खांबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेगावच्या दिशेनं कूच केलं होतं. बुलढाण्यातल्या चिखलीत दोनशे पोलिसांच्या ताफ्यानं मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी काही काळ रस्त्यावरच धरणं आंदोलन केलं. त्यांनी राहुल गांधी आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आम्हाला अडवलं असलं तरी आमचे कार्यकर्ते शेगावात धडकून राहुल गांधींची सभा उधळून लावणारच असा विश्वास मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 


अकोल्यात शेगावाकडे जाणाऱ्या मनसेच्या 100 वर कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी स्थानबद्ध केलंय. मनसे जिल्हाप्रमुख राजेश काळेंसह कार्यकर्त्यांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मनसेच्या डाबकी रोडवरील जिल्हा कार्यालयातून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावळी मनसे कार्यकर्त्यांनी राहूल गांधींविरोधात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केलीय. दरम्यान, अकोल्यातील अनेक मनसे कार्यकर्ते भूमिगत झाल्याने पोलिसांची शोधाशोध सुरू आहे. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नजिकच्या भगूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. भगूर ही सावरकरांची जन्मभूमी आहे. त्यामुळं शिवसेनेतल्या शिंदे गटासह भाजप आणि मनसेनंही भगूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भगूरमध्ये सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळून सारे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. राहुल गांधीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आबालवृद्ध सारेच रस्त्यावर उतरले होते. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे, हिंदुत्ववादी संघटना आणि धर्म अभ्यासकांनी एकत्र येऊन राहुल गांधींविरोधात आंदोलन छेडण्यात आलं. राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सावरकर स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेचं विधीवत पूजन करण्यात आलं. भगूरचा सारा परिसर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयजयकारानं दणाणून गेला होता. आंदोलकांनी गावात पदयात्रा काढून राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


मनसे कार्यकर्त्यांची गफलत, भूपेश बघेल यांच्या गाडीलाच काळे झेंडे दाखवले -
आज शेगाव येथे मनसे कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ताफा समजून चक्क छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार घडलाय. बघेल हे आज शेगाव येथे राहूल गांधींच्या सभेसाठी आलेयेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आनंदसागरजवळच्या अंबर रेस्टॉरेंटसमोर बघेल यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत राहूल गांधीविरोधी घोषणा दिल्यात. एकाएकी झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची मोठी धावपळ झालीय. याच मार्गावरून सभास्थळी जाण्यासाठी राहूल गांधींचा ताफा जाणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांची गफलत झाल्याचं बोललं जातंय.


नारायण राणे यांची राहुल गांधींवर टीका -
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्य सावरकर यांच्या बद्दल केलेला वक्तव्य बाबत नारायण राणे यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला नारायण राणे यांनी बोलताना..भाजपने या गोष्टीचा निषेध केला आहे ...इतके वर्ष देशात सत्तेत होते आता त्याला भारत जोडो करावासा वाटतो ...आता स्वतःची यातायात करून घेतायत.. तीच तीच लोक सगळ्या दौऱ्यात आहेत ....महाराष्ट्रात नवीन लोक काही सामील होत नाहीत... शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस हे सगळे पक्ष भारत जोडो आहेत.. अजून या तीन पक्षाचे मन जुळले नाहीत ते जोडलेले नाहीत.. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात ..अशी टीका राणे यांनी केली पुढे बोलताना हे चित्र आहे यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही असे सांगितले.