Belgaon News : एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर तिथल्या जेवणासोबत तिथलं वातावरण कसं आहे, हॉटेलची रचना कशी आहे, बैठकव्यवस्था कशी आहे, याकडेही आपण लक्ष देतो. सध्या वेगवेगळ्या रचना असलेली हॉटेल पाहायला मिळतात. असंच एक हॉटेल बेळगावमध्ये (Belgaon) आहे. बाहेरुन पाहिला तर तुम्हाला तो किल्ला (Fort) वाटेल. परंतु हा किल्ला नसून हॉटेल (Hotel) आहे, हे सांगितल्यावर काही क्षण विश्वास बसणार नाही. हे हॉटेल एका शिवप्रेमीचं आहे. आपला वारसा, संस्कृती पुढील पिढीला समजावी म्हणून या शिवप्रेमीने उभारलेले 'येस राजवाडा' हे हॉटेल आहे.
शेंगा आणि गूळ देऊन स्वागत, जेवण्यासाठी भारतीय बैठक
लक्ष्मीकांत पाटील म्हणजे अस्सल शिवप्रेमी व्यक्तिमत्त्व. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे दैवत. किल्ल्यासारखी तटबंदी, बुरुजावर उभारलेले मावळे पाहिले की आपण शिवकाळात जातो. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की एका बाजूला नजरेस पडते छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ आणि शिवराय. तिथून आत गेल्यावर अनेक किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने पाहिली की पाहणाऱ्यांचा उर अभिमानाने भरुन येतो. भोजनाच्या दालनात लोड तक्के असून जेवणाचे ताट चौरंगावर ठेवले जाते. अस्सल भारतीय बैठक असून मांसाहारी आणि शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेता येतो. हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकाला प्रथम शेंगा आणि गूळ दिले जाते. आजही ग्रामीण भागात आजही घरी आलेल्या व्यक्तीला शेंगा आणि गूळ देऊन स्वागत केले जाते. आपली परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न.
किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने
सिंधुदुर्ग, विशाळगड, पन्हाळा, सिंहगड,पारगड, प्रतापगड, रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी अशी भोजनाच्या दालनांची नावे आहेत. हॉटेलच्या मागच्या बाजूस एखाद्या राजवाड्याचा फील यावा अशा पद्धतीचे स्टेज आहे. तिथे तुम्ही सहकुटुंब किंवा मित्रमंडळीसह वाढदिवस किंवा अॅनिवर्सरी साजरी करु शकता.
शाही थाळी हे येस राजवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य
हॉटेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दर्शन घडवणारी देखणी पोस्टर्स देखील लक्ष वेधून घेतात. शाही थाळी हे येस राजवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य. एका थाळीत दोन जण भरपेट जेवण करु शकतात. मटण, चिकनचे विविध प्रकार आणि सोबतीला तांबडा, पांढरा रस्सा आणि बरेच काही आहे. शाकाहारी थाळी देखील येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हॉटेलचे कर्मचारी अगदी आग्रह करुन वाढतात. हॉटेलचे मालक लक्ष्मीकांत पाटील ग्राहकांशी संवाद साधून त्यांचा अभिप्राय जाणून घेतात.
बाहेर हॉटेलात जेवायला तर सगळे जण जातात मात्र पूर्ण शिवमय वातावरणात जेवणाची संधी मिळाली तर त्याचा आनंद कसा असतो हे अनुभवायला येस राजवाडाला भेट द्यायलाच पाहिजे. कोल्हापूरहून येताना कोगनोळी टोलनाका पार करुन आल्यावर निपाणीकडे जाताना मांगुर फाटा येथे आत गेल्यावर जत्राट गावात नदीकाठी हे हॉटेल आहे.