Pune Rahul gandhi: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेक शहरात राहुल गांधी यांचा निषेध केला जात आहे. आज पुण्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील कॉंग्रेस भवनासमोर उभ्या असलेल्या भारत जोडो यात्रेच्या गाडीवर असलेल्या राहुल गाधींच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांकडून काळे फासण्यात आले. त्याचबरोबर दुसरा फ्लेक्स फाडण्यात आला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनावर धडक मोर्चा नेला होता. एकत्र येत कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध केला. त्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसभवनावर गोंधळ केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शहरात त्यांच्या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेलं वक्तव्य आताचं नाही आहे. हा वाद फार आधीचा आहे. मात्र भारत जोडो यात्रेत बाधा आणण्यासाठी भाजपतर्फे असं कृत्य करण्यात येत आहे, असा आरोप कॉंग्रेसने भाजपवर केला आहे. यापूर्वीही  छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान झाला त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते झोपले होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भारत जोडो यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. हे त्यांच्या डोळ्यात येत आहे. केवळ राजकारण करायचं म्हणून भाजपने हे कृत्य केलं आहे. भारत जोडो यात्रेचं हे यश आहे. त्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे घाबरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 


कॉंग्रेसची दारं ही कायम सर्वसामान्यांसाठी आणि सगळ्यांसाठीचं उघडे असतात. आज राहुल गांधींची विदर्भातील शेगावमध्ये सभा आहे. हा कॉंग्रेस भवनावर झालेला भ्याड हल्ला आहे. त्यांच्यात हिंमत असतील तर त्यांनी मागून हल्ला केला नसता. कॉंग्रेसचे 1000 नेते पुण्यातून शेगावला गेले आहेत. हे भाजपवाल्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. नाहीतर त्यांची कॉंग्रेस भवनावर हल्ला करण्याची हिंमत केली नसती, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यात प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. याचीच भीती भाजपला वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांना असे हल्ले करण्याची बुद्धी सुचत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.