ठाणे : कोविडमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि साधन सामुग्री पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट नवख्या कंपनीला देऊन ठाणे महापालिकेने भष्टाचार केला असल्याचा आरोप मनसे नेते अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषदेत यांनी केला. महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले. तर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिरसंधान केले.
ठाणे महापालिकेची सत्ता पालकमंत्री एकनाथ शिंदे चालवतात. त्यामुळे कुणाच्या आशीर्वादाने या कंपनीला कंत्राट मिळाले याचीही चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आरोपात म्हटले आहे. या प्रकाराबद्दल लवकरच महापालिकेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. अविनाश जाधव यांना अटक केली जावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला.
कोरोना रूग्णांसाठी तयार केलेल्या ग्लोबल रूग्णालयात कंत्राटी पद्धताने काही महिलांची भरती करण्यात आली होती. 31 जुलैला या कर्मचाऱ्यांना अचानक कामावर येऊ नका, अशी नोटीस बजावण्यात आली. या नोटीसमुळे मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. तर ठाण्यात कोरोनासाठी बांधण्यात आलेल्या ग्लोबल रूग्णालयात सुरक्षारक्षकांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अविनाश जाधव अडचणीचे ठरु लागल्यानंतर त्यांनी आणलेल्या दबावामुळे ही अटक झाल्याचा आरोप मनसेने केला. ठाणे महापालिकेने अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या 'ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला करोना रुग्णालयात वैद्याकीय कर्मचारी तसेच साधनसामुग्री पुरवण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. महापालिकेने 18 जुलैला यासंबधीची निविदा काढली होती आणि आठवड्याभरात या कंपनीला कंत्राटही मिळाल्याचेही ते म्हणाले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे विभागाने ही रूग्णालये आम्हाला चालवण्यास द्या, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र त्यांनाही महापालिकेने प्रतिसाद दिला नाही. महापालिकेच्या या कारभाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू असंही अभिजीत पानसे म्हणाले. मुंबई महापालिकेने मान्यता रद्द केलेले पीपीई किट ठाणे महापालिकेने घेतले आणि त्या दहा हजारांचे बिल दोन दिवसांत चुकते केले. या पीपीई किटची पालिकेने तपासणी केले नसल्याचे पानसे म्हणाले. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष रवी मोरे, नैनेश पाटणकर, महेश कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने केलेल्या आरोपांना ठाणे महापालिका रीतसर उत्तरे देईल, असे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले. तर पालकमंत्र्यांवर केलेल्या आरोपाला ठाणे पालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी चोख उत्तर दिले आहे.