मुंबई: अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आणि संकेतस्थळावर मराठी भाषा उपलब्ध करुन द्यावी करावा अशी वारंवार मागणी मनसेकडून केली जात असताना त्याला नकार देत राज ठाकरेंना थेट न्यायालयात खेचल्यानं अमेझॉनविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. पवई आणि साकीनाका परिसरातील ॲमेझॉनच्या कार्यालयासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि चांदिवलीतील कार्यालयही फोडल्याची घटना घडली आहे.
ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अॅमेझॉनकडं केली होती. सुरुवातीला या मागणीबाबत सकारत्मकता दाखवणाऱ्या अॅमेझॉनने नंतर मात्र मराठीच्या वापराला नकार देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोर्टात खेचलं आहे. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते अॅमेझॉनविरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
अॅमेझॉनने मराठी भाषेबाबत घेतलेल्या भूमिकेवर मनसेनं 'नो मराठी, नो ॲमेझॉन' अशा मजकूराचे पोस्टर्स मुंबईभर लावले होते. चेंबूर परिसरातील बस स्थानकातील आणि बसवरच्या अॅमेझॉनच्या जाहिराती मनसे कार्यकर्त्यांनी फाडल्या होत्या. सोशल मीडियावर 'बॅन अॅमेझॉन' अशा प्रकारची मोहीम सुरु करण्यात आली होती. 'महाराष्ट्रात फक्त मराठी. इथून पुढे तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी...' असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉन विरोधात शड्डू ठोकला आहे.
अॅमेझॉनच्या वतीनं त्या-त्या राज्यांत संबंधित भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातोय. याला अपवाद फक्त महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात मराठीचा वापर अॅमेझॉनने आपल्या संकेतस्थळावर आणि अॅपवर करावं यासाठी मनसेनं कंपनीच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देऊन तशी मागणी केली होती. सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या अॅमेझॉनने नंतर मात्र मराठीचा वापर करणार नाही असं सांगितलं. आणि यात कमी की काय म्हणून न्यायालयात मनेसविरोधात याचिका दाखल केली आहे.
या पार्श्वभूमीवर दिंडोशी न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवलेली आहे. ही नोटीस येताच मनसे सैनिक आक्रमक झाले असून त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या ॲमेझॉनच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे.
ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषा उपलब्ध करुन द्यावी यासाठी आधीही अनेकांनी मागणी केली होती. मात्र त्यांना ॲमेझॉनने प्रतिसाद दिलेला नाही. कोट्यवधी मराठी भाषिक ॲमेझॉन ॲपच्या माध्यमातून खरेदी करत असताना ॲमेझॉन या मागणीकडं दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर केला नाही तरी चालतो, तसा कोणताही कायदा नसल्याचा युक्तिवाद अॅमेझॉननं कोर्टात केलेला आहे. ॲमेझॉनला तेवढ्याच ताकतीनं उत्तर देण्यासाठी मनसेच्या कायदे तज्ञांची टीम सक्रिय झालेली आहे. आता हे प्रकरण थेट कोर्टात गेलंय. मनसेच्या खळ्ळखट्याकन स्टाईल उत्तरानं मनसे-अॅमेझॉन वाद जास्तच चिघळण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडिओ: MNS vs Amazon : मनसेचं अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक, चांदिवलीमधील कार्यालय फोडलं
महत्वाच्या बातम्या:
- मनसे-अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, अॅपवर उपलब्ध करुन दिला मराठीचा पर्याय
- Amazon vs MNS Case | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’, मुंबईभर पोस्टर लावत मनसे आक्रमक