मुंबई: अॅमेझॉनने आपल्या अॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा यासाठी मनसे-अॅमेझॉनचं रस्त्यावरचं भांडण आता न्यायालयात गेलं असताना अॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टनं मात्र मराठीचा स्वीकार केल्याचं दिसून आलंय.
मनसेच्या मराठीच्या आग्रहावर अॅमेझॉननं काही दिवसापूर्वी आपण मराठीचा वापर करु शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावरुन मुंबईभर मनसेनं 'नो मराठी नो अॅमेझॉन' असे पोस्टर्स लावले होते. चेंबूर परिसरातील काही बस स्थानकावरच्या आणि बसवरच्या अॅमेझॉनच्या जाहिराती मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची घटना घडली. आता या प्रश्नावरुन दिंडोशी न्यायालयानं राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. एकीकडे या प्रश्नावर अॅमेझॉन न्यायालयात गेलं असताना फ्लिपकार्टनं मात्र या प्रश्नावर मराठीचा वापर करण्याचं मान्य केलं असून त्याची सुरुवातही केली आहे.
मराठीच्या वापरावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेत अॅमेझॉनला मनसे स्टाईलनं उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच इतर राज्यातील भाषांचा वापर त्या-त्या राज्यात करण्यात येत असताना महाराष्ट्रात मराठीचा वापर का करण्यात येत नाही असा सवाल मनसेनं अॅमेझॉनला केला होता. यावर सुरुवातीला मराठीच्या वापराबद्दल सकारात्मकता दाखवणाऱ्या अॅमेझॉनने नंतर मात्र मराठीचा वापर केला जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संपूर्ण मुंबईभर मनसेनं 'नो मराठी नो अॅमेझॉन' असे पोस्टर्स लावले होते.
मनसेनं मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अॅमेझॉनने हा प्रश्न न्यायालयात नेला आहे. दिंडोशी न्यायालयानं या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने राज ठाकरे यांना 5 जानेवारी 2021 रोजी न्यायालयात व्यक्तिगतरित्या उपस्थित रहावं असं समन्स बजावलं आहे. मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची लक्षणं आहेत.
महत्वाच्या बातम्या: