नाशिक : मुंबईतून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये मुंबई- नाशिक महामार्गावरुन जात असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते, पालकमंत्री छगन भुजबळ हेसुद्धा प्रवास करत यांनीही या वाहतूक कोंडीचा सामना केला. मुंबईहून नाशिकला निघालं असताना त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.


वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला असंख्य नागरिक सातत्यानं सामोरे जात असतात, त्यातच सुट्ट्यांच्या या दिवसांत तर रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडी अनेकांच्या डोकेदुखीचं कारण ठरते. भुजबळ यांनाही काहीशी अशीच चित्रं पाहायला मिळाली. त्यांचं वाहन ज्यावेळी घोटी टोल नाक्यापाशी आलं तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती उदभवली. ज्यानंतर त्यांनी स्वत: वाहनातून खाली उतरत त्या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावला.


Rajinikanth Hospitalised | रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल


अनेक वाहनांना विना टोल जाऊ देत त्यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी आणि इतर अनेकांसाठीच त्यांचं हे रुप काहीसं थक्कं करणारं होतं. खुद्द भुजबळ इथं वाहतूक कोंडी सोडवत असल्याचं लक्षात येताच त्यांच्यावर काही कॅमेरेही रोखले होते.


जनतेच्या हितासाठी मंत्रीमंडळात सातत्यानं कार्यरत असणाऱ्या मंत्रीमहोदयांची ही अशी जनसेवा खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे. दरम्यान, नाताळ सण आणि पुढं अवघ्या काही दिवसांनी येणारं थर्टी फर्स्ट या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या वाहतूक कोंडीचा सामना साऱ्यांना करावा लागत आहेत. हे उदाहरण पाहता मंत्रीमहोदयही याला अपवाद नाहीत हेच खरं.



लोणावळा, नाशिक, अलिबागच्या दिशेनं मुंबईकरांचा ओघ; रस्ते फुल्ल


मुंबईतील नाईट कर्फ्यू आणि काही निर्बंध शिवाय शहराच्या धकाधकीपासून दूर जाण्याच्या इच्छेनं अनेक मुंबईकरांचे पाय नाशिक, लोणावळा, महाबळेश्वर, नाशिक आणि अलिबागच्या दिशेनं वळले आहेत. परिणामी काही निवडक टोल नाके आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. दोन- तीन तासांच्या प्रवासासाठी अनेकांना जास्तीचा एक- दोन तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळं सुट्टीच्या आनंदाचा आस्वाद घेण्यापूर्वी या मंडळींना वाहतूक कोंडीमुळं होणारा मनस्ताप सहन करावा लागत आहे.