मुंबई: अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आणि वेबसाईटवर मराठी भाषेचा वापर व्हावा अशी मागणी करणाऱ्या मनसेनं आता या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहलेली पोस्टर्स मनसेकडून मुंबईभर लावण्यात आली आहेत.
मुंबईतील माहीम, अंधेरी, बीकेसी, वांद्रे आणि इतर भागातही मनसेनं अशा प्रकारची पोस्टर्स लावल्याचं पहायला मिळतंय. 'तुम्हाला महाराष्ट्रात आमची मराठी भाषा मान्य नाही, आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही' अशा प्रकारचा मजकूरही त्यावर लिहण्यात आला आहे.
माहीम, अंधेरी, बीकेसी या भागांत ज्या-ज्या ठिकाणी अॅमेझॉनच्या जाहिरातीची पोस्टर्स आहेत त्यावर मनसेनं 'नो मराठी, नो अॅमेझॉन' अशा प्रकारचा मजकूर लिहला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून ही पोस्टर्स लावण्यात आल्याचं समजतंय.
काही दिवसांपूर्वी मनसेनं अॅमेझॉनच्या अॅपमध्ये आणि वेबसाईटवर मराठी भाषेचा वापर व्हावा अशी मागणी केली आहे. त्या-त्या राज्यात अॅमेझॉनकडून संबंधित भाषेचा वापर केला जातो. पण महाराष्ट्रात मराठीचा वापर केला जात नाही. यावर आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट दिली होती आणि मराठीचा वापर करावा अशी मागणी केली होती.
मनसेच्या या मागणीची दखल अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी घेत मराठीच्या वापरावर सकारात्मक असल्याचं सांगत तशा प्रकारचा ई-मेल मनसेला केला होता. त्यानंतर या प्रश्नावर अॅमेझॉनचं एक शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. पण या गोष्टीला दोन महिने पूर्ण होत आले तरी यावर अॅमेझॉनने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रश्नावर आता मनसे आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या: