चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून आणि मिठाई वाटून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा अनोखा वाढदिवस महावितरणच्या मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला. मात्र हा वाढदिवस म्हणजे मनसेचे मुख्यमंत्र्यांवर उफाळून आलेले प्रेम नव्हते, तर हा मनसेच्या आंदोलनाचा एक भाग होता.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना आलेली विजेची भरमसाठ बिलं माफ करावी, यासाठी मनसेकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांचा रोष मुख्यतः ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर दिसून आला. त्यांच्या मते ऊर्जामंत्री नितीन राऊत उलटसुलट वक्तव्य करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वीजबिलात दिलासा देण्याची मागणी करत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.
गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूचक फोटो ट्वीट
लॉकडाऊन काळातील वीज बिलासंदर्भात अजूनही गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेमध्ये रोष आहे. परंतु राज्याचे ऊर्जामंत्री हे महावितरण कंपनीची पाठराखण करत आहे. नागरिकांना आलेली वीजबिले बरोबर आहेत. त्यामुळे जनता वीजबिल भरत आहे. वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढले आहे, अशी वायफळ बडबड ऊर्जामंत्री करत असल्याचा मनसेचा आरोप आहे. दुसरीकडे महावितरण कंपनीने आपल्या घरचे वीज कनेक्शन कापू नये, या भीतीपोटी अनेक नागरिकांनी आर्थिक अडचण असताना देखील वीजबिले भरली आहेत.
Happy Birthday Uddhav Thackeray | वडिलांकडून राजकारणाचे धडे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
मात्र या गोष्टीचा चुकीचा हवाला देत ऊर्जामंत्री नितीन राऊत विरोधक विनाकारण आंदोलने करत आहेत, असं वक्तव्य करतात. पण जबाबदार सरकार म्हणून जनतेला वीजबिल रकमेमध्ये दिलासा देण्याचे काम मात्र अद्याप सरकारने केले नाही. लॉकडाऊन काळातील वीजबिलात जनतेला दिलासा मिळावा म्हणून मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेला लॉकडाऊन काळातील वीजबिलात दिलासा मिळावा, याकरिता लॉकडाऊन काळातील वीजबिलात प्रती युनिट किमान दर 3.46 रुपये आकारावे, बिलावरील व्याज व इतर शुल्क माफ करावे, बिल भरण्यास 12 महिन्याची मुदत द्यावी, अशा मागण्या मनसेकडून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हात ठिकठिकाणी होर्डिंग-फ्लेक्स लागले. अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वर्तमानपत्रात भरभरून जाहिराती देखील आल्या. मात्र मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साजरा केलेला हा वाढदिवस अनोखा असाच म्हणावा लागेल.