मुंबई : इगो म्हणजेच अहंकार काय असतो, याची प्रचिती वसई-विरारकरांना आली आहे. नेत्यांची वाट पाहून थकलेल्या वसईकरांनी एका उड्डाणपुलाचं स्वत:च उद्घाटन केलं. मात्र इगो हर्ट झालेल्या एमएमआरडीएने पुन्हा उड्डाणपूल बंद करुन, सर्वसामान्य नागरिकांना असे उद्घाटनाचे कोणतेही अधिकार नसल्याचं दाखवून दिलं.
काय आहे प्रकरण?
वसई पूर्व-पश्चिम असा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा बराच वेळ वाचणार आहे. मात्र उड्डाणपूल तयार होऊन अनेक महिने झाले, मात्र उद्धाटनाअभावी तो बंद आहे. आज - उद्या करत अनेक दिवस झाले तरी हा पूल सुरुच केलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी या पुलाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र बुधवारी मुख्यमंत्री न आल्याने, वैतागलेल्या वसईकरांनी स्वत:च या पुलाचं उद्घाटन केलं.
सध्या पूर्व - पश्चिमेला जाण्यासाठी एकच ब्रीज आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होते. बुधवारी संध्याकाळी देखील अशीच वाहतूक कोंडी झाली आणि संतापलेल्या नागरिकांनी हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरु केला. विशेष म्हणजे श्रेयासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघडीचे बोर्डही लागले होते.
मात्र या उद्घाटनाने एमएमआरडीएचा इगो हर्ट झाला. एमएमआरडीएने पुन्हा बॅरिकेट्स लावून, हा पूल बंद केला.
याबाबतची विचारणा एमएमआरडीएकडे केली असता, या पुलाचं थोडं काम बाकी असल्यामुळे, पुन्हा बंद केल्याची सारवासारव करण्यात आली.