औरंगाबाद : रेल्वेखाली उडी घेऊन 19 वर्षीय मेडिकल विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. रॅगिंग तसंच मैत्रिणींसोबतच्या विसंवादातून तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. शिवाजीनगर भागात गुरुवारी सकाळी आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.


 

 

प्रतीक्षा मोतीराम वाघ असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची औरंगाबादची आहे.  ही विद्यार्थिनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती.

 

 

होस्टेलमध्ये मैत्रिणींकडून होणारी रॅगिंग, सततचा छळ, चोरीचा आरोपाला कंटाळून प्रतीक्षाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आत्महत्येपूर्वी तिने मैत्रिणीला मेसेज केला होता.

 

 

प्रतीक्षाचे वडील मोतीराम वाघ हे भारतीय स्टेट बँक लाइफ इन्शुरन्समध्ये व्यवस्थापक आहेत. प्रतीक्षाच्या मैत्रिणींनी रॅगिंग करुन माझ्या मुलीला त्रास दिला, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप मोतीराम वाघ यांनी केला आहे.

 

 

मृत्यूपूर्वी प्रतीक्षाने मैत्रिणीला केलेला शेवटचा मेसेज

"तुझ्यामुळं मला हे पाऊल उचलावं लागत आहे. माझ्या शेवटास तूच जबाबदार आहे. पण हे मी कोणाला सांगणार नाही. तुझ्या खुशीसाठी मी माझा जीव देत आहे. आणि जोपर्यंत तू हा मेसेज वाचशील तोपर्यंत मी कधीची मेले असेन. कृपा करुन आपलं काय भांडण झालं कोणाला नाही कळलं तर बरं होईल. तस मी तर मरुन चालले, पण माझ्या आईला थोडा सपोर्ट दे. आणि तुझं नाव कोणाला कळू देत नाही मी."