मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांनुसार आपल्याला सर्वात आधी ठरवायचं होतं की, मूळ राजकीय पक्ष कोणाचा आहे.त्यामुळे शिंदेंची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना यासंदर्भात निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी तीन गोष्टी तपासून पाहायला सांगितल्या होत्या. त्यामध्ये पक्षाची घटना आणि त्यातील तरतुदी पाहायला सांगितल्या होत्या. पक्षाची रचना पाहायला सांगितली होती. सगळ्या मुद्द्यांचा विचार करुन मूळ पक्ष कोणाचा हा निर्णय देण्यात आलाय. निर्णय देताना सर्व बाबींचा योग्य खुलासा देखील करण्यात आलाय. त्यामुळे मला खात्री आहे की हा अत्यंत योग्य आणि श्वाश्वत निर्णय असेल. संसदीय लोकशाहीला धरुन हा निर्णय देण्यात आलाय. कोणता पक्ष नाराज होतोय. कोणता पक्ष आनंदी होतोय, हे पाहणं माझं काम नाही, असं म्हणत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आजच्या आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
मूळ राजकीय पक्ष कोणाचा आहे हा निर्णय दिल्यानंतर कोणाचा व्हीप वैध आहे, हा निर्णय देण्यात आलाय. ज्या पक्षाचा व्हीप वैध ठरवल्यानंतर तो आमदारांपर्यंत व्यवस्थित पोहचला की नाही, हे पाहणं देखील जास्त गरजेचं असतं. भरत गोगावलेंचा व्हीप हा वैध आहे, पण तो ठाकरे गटाच्या आमदारांपर्यंत व्यवस्थित पोहचलाच नाही,म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकरांनी दिली.
त्यांना सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर ते जाऊ शकतात - राहुल नार्वेकर
हा निकाल उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थित वाचला,तर त्यांना या निकालातील गोष्टी कळतील. पण जर त्यांना या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर ते जाऊ शकतात. पण त्याचा अर्थ असा नाही की मी दिलेल्या निकाल हा चुकीचा आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
नेमका निकाल काय?
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.