Shiv Sena MLAs Disqualification Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्याशिवाय एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राहुल नार्वेकरांच्या या निर्णायाविरोधात ठाकरे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांचे डोळे पाणावले होते. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले ? 


मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी  दिलेला निर्णय  निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर अशाच त्यांना वाचवले जाणार आहे. भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झालं.  


अनेक वर्षे  राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा  ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेला आहे. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात  हिटलरशाही सुरू झालेले आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची प्रतिक्रिया - 


कोर्टात जाण्याशिवाय दुसरा धंदाच नाही. काही झालं तरी सकाळी कोर्टात, दुपारी कोर्टात, संध्याकाळी कोर्टात, कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर कोर्ट चांगलं. कोर्टाने जर निकाल मेरिट वर दिला तर कोर्ट वाईट. इलेक्शन कमिशनने जर त्यांच्या बाजूने निकाल दिला तर चांगलं नाहीतर वाईट स अशी टीका शिंदेंनी केली. 


शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाकडून निषेध
राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कार्यकर्ते एकत्र जमल्याचे चित्र आहे. फटाके फोडत, पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना शिंदे गट दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे गट निर्णयाने झाल्याचे दिसून येत आहे. आमदार अपात्रता निर्णयाचा ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.   ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये रोष पाहायला मिळाला. मुंबईच्या रस्त्यावर कार्यकर्ते उतरले.  काळे झेंडेही दाखवण्यात आले.