MLA Disqualification Case Verdict :  गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मोठा निकाल समोर आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी  (Rahul Narwekar)  समतोल निर्णय घेत शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray)  आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. मात्र त्याचवेळी शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकालही त्यांनी दिला. 


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंपासून वेगळा सवतासुभा मांडत भाजपशी घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. नंतर निवडणूक आयोगाने हा त्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांचा हा दावा योग्य ठरवला. या दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनं शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनंही ठाकरे गटातील 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. 


शिवसेना शिंदेंचीच


त्या आधी शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. बहुमताच्या आधारावर शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं ते म्हणाले. राहुल नार्वेकर म्हणाले की, 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते असं महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत.


सत्तांतराच्या काळात शिंदेंचा पक्ष हाचा शिवसेना 


संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने 21 जून 2022 च्या  शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरविता येणार नाही असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं.


सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार


शिंदेंच्या आमदारांना नाराज केल्यात ते नाराज होऊ शकतात, तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवल्यात ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये एक सुवर्णमध्ये साधला गेला असून दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं नाही. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय सर्वोच्य न्यायालयात होण्याची शक्यता आहे.


ही बातमी वाचा: