Nashik Water Crisis : उन्हाळ्यात दुर्गम भागात पाणीटंचाईला (Water Crisis) नेहमीच तोंड द्यावे लागत असताना पेठ (Peth) तालुक्यातील सातपुते भागात ग्रामस्थांना पाणीटंचाईवर मात करण्यात यश आले आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्य माध्यमातून तुषार मिस्त्री कुटुंबीय आणि 2004 च्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या आर्थिक योगदानातून पाणी प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठसह सुरगाणा (Surgana), इगतपुरी (Igatpuri) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा देखील सगळीकडे हीच परिस्थिती असून पेठ तालुक्यातील अनेक भागात दोन दोन तीन किलोमीटर पायी चालून महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मिस्त्री कुटुंबीयांनी आपल्या तरुण मुलाच्या स्मरणार्थ आणि आरटीओ बॅचच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत पेठ तालुक्यातील सातपुते पाडा या गावाचा पाणी प्रश्न सोडवला आहे.


पेठ तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत असल्याने यापैकी सातपुतेपाडा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एसएनएफने आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुळ सांगलीच्या आणि सध्या नाशिकला स्थायिक मिस्त्री कुटुंबीयांनी एसएनएफच्या जलाभियानातील सातपुतेपाडा या गावासाठी मदत करण्याचे ठरवले. या कुटुंबाने कोवीड काळात आपला तरुण मुलगा गमावला. आपल्या मुलाच्या तरुण वयातील दुर्दैवी निधनाचा आघात सहन करून मुलाच्या स्मरणार्थ मिस्त्री कुटुंबीयांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर 2004 च्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या तुकडीने इतर साहित्यासाठी आर्थिक मदत केली. तर गावातील पाण्याच्या टाकीची जबाबदारी जुनोठी या ग्रामपंचायतने उचलली. त्यांच्या या निर्णयाने एका दुर्गम भागातील शेकडो लोकांच्या दारात पाणी पोहोचले. एकूणच  मिस्त्री कुटुंबीयांच्या निर्णयाने सातपुतेपाड्यातील ग्रामस्थांच्या पाण्यासाठीचा संघर्ष काही प्रमाणात कमी झाला आहे. 


असा साकारला प्रकल्प


पेठ तालुक्यातील जूनोठी ग्रामपणाच्यात अंतर्गत येणारे सातपुतेपाडा गेली अनेक वर्षे पाणी टंचाईचा सामना करत होते. येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात दोन अडीच किलोमीटरपर्यंत पाण्याच्या शोधात भटकण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. दुर्गम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देणाऱ्या एसएनएफ संस्थेपर्यंत या गावाची माहिती आली आणि संस्थेने पाहणी करून या गावाचा पाणी प्रश्न हाती घेतला. एसएनएफच्या जलतज्ञांनी गावाजवळ पाण्याचा एक श्रोत शोधून तिथे गावकऱ्यांनी श्रमदानातून विहीर खोदली. तिथून गावात पाणी आणण्यासाठी पाईपलाईन, वीजपंप आणि टाकीची गरज होती. यासाठी आवाहन केल्यानंतर मिस्त्री कुटुंबीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गाव पाणी टंचाईमुक्त झाले आहे.