नागपूर : नागपुरातील राजश्री टंडन या महिला वकिलाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वडिलांवरुन आरोपी तरुणाला राजश्री टंडन या टोमणे मारत असत, याच रागातून सुरेंद्रगड परिसरातील पाठलाग करुन भर वस्तीत आरोपीने टंडन यांची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नागपुरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड परिसरात वकील राजश्री टंडन यांच्या हत्येची घटना घडली. राजश्री टंडन या 45 वर्षांच्या होत्या.
आरोपी अल्पवयीन असून, त्याचे वय 17 वर्षे आहे. शिवाय, वकील राजश्री टंडन यांच्या घराशेजारीच त्याचंही घर आहे.
हत्येचं कारण काय?
अल्पवयीन आरोपीचे वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहेत. वकील राजश्री टंडन यांनी काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या वडिलांची पोलिसांकडे तक्रार देऊन, त्यांना तडीपार केले होते. अद्यापही आरोपीचे वडील तडीपारच आहेत. त्यामुळे वकील आणि आरोपीच्या कुटुंबांमध्ये धुसफूस होती.
काल (14 एप्रिल) संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला, मात्र यावेळी वादाने टोक गाठलं. राजश्री टंडन औषधं खरेदी करण्यासाठी घराजवळील दुकानात गेल्या असताना, अल्पवयीन आरोपीने राजश्री टंडन यांचा पाठलाग करत चाकूने हल्ला केला. त्यानंतर घाबरलेल्या राजश्री यांनी जीव वाचवण्यासाठी फोटो स्टुडिओचा आश्रय घेतला. मात्र, रागात असलेल्या आरोपीने फोटो स्टुडिओमध्ये घुसून राजश्री यांची हत्या केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमधील भीती आणखी वाढत आहे. विशेष म्हणजे गृहमंत्रिपदही मुख्यमंत्र्यांकडेच आहे. मात्र, तरीही गेल्या काही काळात नागपुरातील गुन्हेगारीत कमालीची वाढ होते आहे.
संबंधित बातमी : वडिलांना तडीपार करणाऱ्या महिला वकिलाची नागपुरात भर वस्तीत हत्या