Pune News : पुण्यात होणाऱ्या G-20 च्या पार्श्वभूमीवर जन भागीदारी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील सर्व शाळांमध्ये जी 20 आणि नवीन शैक्षणिक धोरण याबाबत जागृती केली जाणार आहे. जी -20 संदर्भात आणि शैक्षणिक धोरणांसदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातील पाच लाख शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. 


5.01 लाख शाळांमधील 1.19 कोटी विद्यार्थी आणि 13.9 लाख शिक्षक, समाजातील 19.5 लाख लोक असे एकूण 1.53 कोटी लोक जनभागिदारी उपक्रमात सहभागी होणार आहे. “Ensuring Foundation Literacy and Numeracy (FLN)” या थिम अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जी-20 परिषदेसंदर्भात माहिती देण्यासाठी आणि त्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


या अनुषंगाने 1 ते 15 जून 2023 या कालावधीत कार्यशाळा, प्रदर्शने, चर्चासत्रे, परिषदा अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य, जिल्हा, तालुका, पंचायत आणि शालेय स्तरावर सर्व स्तरातील लोकांना सहभागी करून घेण्यासाठी देशभरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांसंदर्भात माहिती मिळणार आहे. या माहितीचा विद्यार्थ्य़ांना भविष्यात उपयोग होणार आहे. 


पुण्यातील केंद्रीय विद्यालय गणेशखिंड येथे 15 जूनला “Ensuring Foundation Literacy and Numeracy (FLN)” या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संबंधित शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.  भारत यावर्षी जी-20 समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभरात विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जात आहेत.


गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात 15 जून रोजी होणाऱ्या कार्यशाळेत पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयासोबतच पुण्यातील अनेक सीबीएससी विद्यालयातील शिक्षक आणि अनेक शिक्षण तज्ञ सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत “Ensuring Foundation Literacy and Numeracy (FLN)” यासंबंधीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सोबतच या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी बनवलेल्या विविध शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या कार्यशाळेत शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी होतील. गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान यांनी या कार्यशाळेबद्दल माहिती देऊन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


हे ही वाचा-


Pravin Masale : मुलांना सलाम! वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचनालयांना ग्रंथ संच भेट; प्रत्येक वाचनालयाशी संपर्क करुन होणार वितरण