Pravin Masale : वडिलांचा स्मृती दिन अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात. कोणी मोठं सेलेब्रिशन करतात तर अनेक लोक छोटेखानी कार्यक्रम करतात मात्र वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवीण मसालेवाले ट्रस्ट यांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनालयांना ग्रंथ संच भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ते अनेक वाचनालनांना ग्रंथ वाटप करणार आहेत. 


भाकरी ही पोटाची गरज आहे. मात्र, भावना जागवायला आणि मने फुलवायला विचारच उपयोगी ठरतात. ते केवळ साहित्यामधून मिळतात. वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयांना ग्रंथ संच भेट देणे, ही कल्पनाच विलक्षण आहे, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.


प्रत्येक वाचनालयाशी संपर्क करुन वितरण होणार!


प्रवीण मसालेवाले ट्रस्ट आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम झाला. प्रवीण मसालेवाले उद्योग समुहाचे संस्थापक हुकमीचंदजी चोरडिया यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त ट्रस्ट तर्फे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथसंच भेट दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाची प्रातिनिधीक सुरुवात नवी पेठ येथील पत्रकार भवन मधील एका कार्यक्रमात झाली. पुढील महिनाभरात प्रत्येक वाचनालयाशी संपर्क करुन या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ. वीणा देव यांच्या हस्ते ग्रंथ संच भेट देण्यात आले. 


'ग्रंथालयांची दुरवस्था सभ्यतेचं लक्षण नाही'


देवालये आणि मद्यालये सुंदर होत असताना ग्रंथालयांची दुरवस्था होणे हे समाजाच्या सभ्यतेचे लक्षण नाही. सध्या विद्यार्थ्यांना खेळ आणि वाचनासाठी वेळच नाही, हे अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या हाती चांगली पुस्तके पोहोचली पाहिजेत. लक्ष्मीची उपासना करताना चोरडिया कुटुंबीयांनी सरस्वतीची पाठराखण केली, हे दर्शन पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात घडले आहे, असं प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.


'पुस्तकांची गुणवत्ता चांगली असावी'


एखाद्या व्यक्तीच्या स्मृती जागविण्यासाठी आपण काय करता, हे फार महत्त्वाचे आहे. प्रवीण मसालेवाले या उद्योगामधून पोटाची तृप्ती केली जात असेल, तरी मनाची आणि बुद्धीची तृप्ती करण्यासाठी ग्रंथसंच भेट देणे, हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे. शाळांच्या वाचनालयांमध्ये स्वस्त पुस्तके असण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता चांगली असावी. मुलांवर चांगले संस्कार होतील अशी पुस्तके निवडायला हवीत, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. वाचनालयांना दिले जाणारे अनुदान हे पुस्तकांच्या संख्येऐवजी चांगल्या पुस्तकांवर आणि त्यांच्या दर्जावर अवलंबून असावे, अशी अपेक्षा डॉ. वीणा देव यांनी व्यक्त केली. 


हुकमीचंद चोरडिया हे अत्यंत उत्तम वाचक होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचन संस्कृतीला बळ मिळावे, यासाठी काहीतरी कार्यक्रम करण्याची इच्छा होती. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व वाचनालयांना ग्रंथसंच भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला, प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया यांनी सांगितलं आहे.