Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांनी पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली, यावर पत्रकार परिषदेत भाष्य केले. आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षातल्या सहकाऱ्यांना मोठी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. देशाचा मोठा विस्तार लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले गेले आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत  शरद पवार यांनी या निर्णयामागील सविस्तर भूमिका मांडली. शरद पवार यांनी म्हटले की, काही सहकाऱ्यांना काही जबाबदारी दिली पाहिजे असं ठरवलं.  इतर राज्यात पक्ष वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चा केल्यानंतर आम्ही या निर्णयाअंती पोहोचलो की काहींवर जबाबदारी सोडवायला पाहिजे. महिन्यात काही दिवस पक्षाचा विस्तार करण्यासाठी बाहेर फिरावं. कार्याध्यक्षाचे दोन पद तयार केले असल्याची माहिती पवारांनी दिली. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब राज्यांची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यकारी अध्यक्षांचे पद किती काळासाठी असणार? यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागेल असे त्यांनी म्हटले. पक्षाची बैठक बोलावून त्याबाबतचा बदल करावा लागणार आहे. 


अध्यक्षपदाचा दावेदार कोण?


माझी जेव्हा जागा खाली होईल तेव्हाच अध्यक्ष पदाचा दावेदार ठरेल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहे आणि जयंत पाटलांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही जबाबदारी नाही 
मात्र सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांकडे कोणतीही तशी जबाबदारी नव्हती याकडेही पवारांनी लक्ष वेधले. अध्यक्ष पदाची जागा आत्ता रिकामी नाही. भविष्यात काय होईल याचं उत्तर काय देणार असे त्यांनी म्हटले. राष्ट्रीय अध्यक्ष पद रिकामं झाल्यावर नवीन अध्यक्षांचा विचार करू. हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, पक्षानं सामूहिक विचार विनिमयानं घेतलेला हा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी म्हटले. 


अजित पवार नाराज?


अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यावर जबाबदारी असल्याचे पवार यांनी म्हटले. अजित पवार नाराज आहे असं काहीजण म्हणतात. पण यामध्ये काही तथ्यं नसल्याचेही पवार यांनी म्हटले.