सांगली : एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय. खरं तर ही आमची मोठी चूक आहे आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी प्रांजळ कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर विश्वजित कदम बोलत होते.



महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागांत तर लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार करत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी देखील काळजी घेत सोशल डिस्टन्स पाळून , सतत हात धुवून, तोंडाला मास्क लावून नियम पाळले पाहिजेत. पण दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय. खरं तर ही आमची मोठी चूक आहे आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे अशी प्रांजळ कबुली विश्वजित कदम यांनी दिलीय. सध्या राज्यात जरी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार आहे असे देखील कदम म्हणालेत. पुन्हा जरी कोरोना वाढतोय हे चित्र खरे असले तरी राज्य सरकार कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही विश्वजित कदम यांनी दिली आहे.


आमदाराची बॉलिंग... तीन मत्र्यांची बॅटिंग..; मंत्री-आमदारामध्ये रंगला क्रिकेटचा डाव


अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ हा विरोधकांचा आरोप चुकीचा
यावेळी कदम म्हणाले की, अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ सरकार करतेय हा चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. मागे कोरोनाच्या काळात जे अधिवेशन झाले त्यावेळी सर्व आमदारांना आणि त्याच्या खासगी कर्मचाऱ्यांना अधिवेशनाला येण्यापूर्वी कोरोना टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.यात 288 पैकी 78 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, अधिवेशन हे होणारच आहे पण अधिवेशनाचा कालावधी किती असावा ही समिती ठरवत असते. 25 तारखेच्या पुढे अधिवेशन किती दिवस घ्यायचे हा देखील निर्णय होईल.


अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना येत्या अधिवेशनात नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय
गारपीट आणि अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरच अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील,अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पाऊस होत असून यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी बोलताना कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे सुरू झाले आहेत,तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांनाही सूचना दिल्या आहेत.आणि नुकसानीचा अहवाल आल्यानंतर सरकार येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेईल,असं मत कदम यांनी व्यक्त केले आहे.राज्य सरकारने यापूर्वी गेल्या वर्षी अवकाळीमुळे नुकसान झाले त्यासाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली होती,यातील साडे पाच हजार कोटी शेतीसाठी वितरित करण्यात आले,उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा विभागाला देण्यात आले.त्यामुळे नुकसानीचा अहवाल आल्यावर निश्चित मदत करण्याबाबतची भूमिका सरकारकडून घेतली जाईल,असं मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.