भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीत कांडात दोन नर्सवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव केलाय. अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तर दोषी डॉक्टरवर गुन्हा का नाही, असा सवाल नर्सेसनी उपस्थित केला आहे.


भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. अनेक राजकीय लोकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेटी देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर या प्रकरणी समिती गठीत करण्यात करुन सात डॉक्टर व नर्सेस वर कारवाही करण्यात आली होती. मात्र, कुणावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सेसवर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. कुठेतरी सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून दोषी डॉक्टर यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडित व लोकप्रतिनिधी यांनी केला आहे.


Bhandara Hospital Fire : भंडाऱ्यात 10 चिमुकल्यांचा जीव घेणाऱ्या आग प्रकरणात अखेर गुन्हा दाखल


भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणात दोन नर्सेस कर्तव्यावर असताना आउट बॉर्न आणि इन बॉर्न या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या नर्सेसना आग लागल्याची माहिती लगेच मिळाली नाही, असे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दोन बाळांच्या मागे एक नर्स असायला पाहिजे होत्या. मात्र, या ठिकाणी 17 बाळांच्या मागे आम्ही दोनच नर्स कर्तव्यावर होतो, तर आज आमच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाल्याने आमच्यावर अन्याय झाला असून रुग्णालय जळीत प्रकरणात संपूर्ण मॅनेजमेंट जबाबदार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मात्र, आम्ही कंत्राटी कर्मचारी असल्याने आमचा बळी घेतला गेला असल्याचे शुभांगी साठवणे या नर्सेसने सांगितले आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयाचं फायर ऑडीट झालेलं नाही, फेबर सिंदुरी चेन्नई येथील कंपनीला देखभाल दुरुस्तीचा कंत्राट दिले होते. मग या कंपनीने वेळोवेळी उपकरणाची देखभाल दुरुस्थी का केली नाही? असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्यामुळे दोन कंत्राटी नर्सेसवर कारवाही करून सरकार कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Bhandara Fire Tragedy | भंडारा दुर्घटनेप्रकरणी अन्याय होत असल्याची परिचारिकांची तक्रार