पंढरपूर : कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.


कोरोनामुळे यात्रा काळात कोणाही भाविकाला अथवा दिंडीला पंढरपूर मध्ये येत येणार नाही. शहरातील सर्व 1200 मठ व धर्मशाळेत आलेल्या भाविक व वारकऱ्यांना परत पाठवायची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली असून यात्रेपूर्वी आलेल्या भाविकांना परत जावे लागणार आहे. मंदिर समितीने यापूर्वीच दशमी व एकादशी म्हणजे 22 आणि 23 फेब्रुवारीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात देवाचे सर्व नित्योपचार व एकादशीची महापूजा कोरानाचे नियम पळून करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . यावेळी उपस्थित राहायची परवानगी दिलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे.


यात्रा काळात वाहतूक व्यवस्था सुरू राहणार असली तरी एकही भाविकाला पंढरपूर मध्ये उतरता येणार नाही. माघी यात्रा काळात वासकर महाराज यांच्या भजन परंपरेला केवळ 6 लोकांना कोरोनाचा नियम पळून परवानगी तर औसेकर महाराज यांच्या चाकरी भजनाला 12 लोकांना नियम पाळून परवानगी दिली आहे. पुंडलिक रायच्या काल्याला 26 वारकरी व मानाकाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.


कोरोनाच्या संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी चैत्री, सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते. वाईट आठवणींचे 2020 साल संपले आणि नवीन 2021 सालात वारकरी संप्रदायाची येणारी पहिली यात्रा पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नाही.