मुंबई : राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्याचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराज असल्याचं दिसून येत आहे. अशातच ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे, त्यांना दुय्यम दर्जाचं खातं मिळाल्यामुळे त्यांच्यातही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढचं नाहीतर मंत्रिमंडळ बैठकीला तसेच सरकारच्या विशेष अधिवेशनालाही दांडी मारली आहे. याच मुद्यावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी महाविकास आघाडी, किंबहुना काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील बी-1 बंगल्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळपासून त्यांच्या बगल्याची दारं, खिडक्या बंद आहेत. खातेवाटपात दुय्यम खाती मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, वडेट्टीवार कुणाशी संवाद साधत नसल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या विशेष अधिवेशानाकडेही त्यांनी पाठ फिरवली. वडेट्टीवारांची नाराजी दूर होईल अशी आशा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.


पाहा व्हिडीओ : विजय वडेट्टीवारांच्या नाराजीवरुन सुधीर मुनगंटीवारांचा टोला



दरम्यान यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक जण नाराज आहेत. तिन्ही वेगळ्या विचारधारेचे हे पक्ष त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. विजय वडेट्टीवार यांची नाराजीबाबत वृत्त समोर येत आहे. त्यांना दुय्यम दर्जाची खाती दिली गेली. त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातं आहे. सध्या त्यांच्याकडे भूकंप पुनर्वसन खातं आहे त्यामुळे कदाचित तेच भूकंप घडवतील आणि मग पुनर्वसन करतील असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.


सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना भाजपा-मनसे युतीबाबतही भाष्य केलं आहे. 'राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर सदिच्छा भेट होती. पण भविष्यात काहीही घडू शकतं', अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (7 जानेवारी) मुंबईत गुप्त बैठक झाली. या बैठकीबाबत विचारलं असता, सुधीर मुनगंटीवार यांनीह भविष्यात मनसे-भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.


दरम्यान, राज्यातील विधीमंडळाचं आज एका दिवसांच विशेष अधिवेशन झालं. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण पुढील 10 वर्षांसाठी वाढवून देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या विशेष अधिवेशनाला काँग्रेसचे नाराज मंत्री विजय वडेट्टीवार मात्र अनुपस्थित राहिले होते.


संबंधित बातम्या : 


भविष्यात काहीही घडू शकतं, ठाकरे-फडणवीस भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया


मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशोक चव्हाण आणि भुजबळांमध्ये वाद, खुर्चीवरुन खटके उडल्याची चर्चा