वर्धा : 'पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं', अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणघेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभुती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आज वर्ध्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराने मोठं नुकसान झालं आहे. सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभं आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यांना पुराशी देणंघेणं नसून कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊंनी केला आहे. 'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले.
येत्या विधानसभेत आमदारकीच्या जागा कशा वाढतील, यादृष्टीनं राष्ट्रवादी काम करत आहे. हा मदत करण्याचा काळ आहे. पण राष्ट्रवादी राजकारणाचा फार्स करत आहे, अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सांगली, कोल्हापुरातील पुरानंतर आता भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवल्यास लोकांना बाहेर जाण्याचे पर्यायी मार्ग तयार करावे लागणार आहेत. पुलांची उंची वाढवावी लागणार आहे. या सरकारने मदतीच्या अर्थसहाय्यत मोठी वाढ केली आहे, असंही खोत यांनी सांगितलं.
यावेळी सदाभाऊंनी यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवरही टीका केली. '2005 मध्ये यांचं सरकार असताना पूर आला तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही. त्यावेळी किती मदत द्यायचे? याचे आकडे जाहीर करावे. मावळ घटनेवेळी, ऊस उत्पादक आंदोलनप्रसंगी यांचं शेतकरी प्रेम कुठं गेलं होतं? असा प्रश्नही खोत यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अभिनेते, नेतेमंडळींची धाव | स्पेशल रिपोर्ट