लातूर : शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे.

आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. मात्र डोंगरज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षक दारु पिऊन शाळेत आले. संग्राम बिराजदार आणि धनाजी दडिमे अशी या शिक्षकांची नावे आहेत.

डोंगरज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 शिक्षक आहेत. यात पाच महिला शिक्षिका आहेत. आठवीपर्यंतच्या या शाळेत 307 विद्यार्थी ज्ञानर्जन करत आहेत. परंतु आज सकाळी परिपाठ सुरु होण्यापूर्वीच हे दोन दारुडे शिक्षक खूप दारु पिऊन शाळेत आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

दोन्ही दारुडे इतर शिक्षकांना शिवीगाळ करु लागले. त्यानंतर या घटनेची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकारी तात्काळ घटनस्थळी आले तरिही या शिक्षकांची दारु उतरली नव्हती.

दोन्ही दारुड्या शिक्षकांनी अधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. तसेच अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर औटपोस्ट करडखेल येथील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शाळेत जाऊन दडीमे आणि बिराजदार या दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतले.

गटशिक्षणाधिकारी वंदणा फुटाणे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे.

या दोन दारुड्या शिक्षकांमुळे शाळा बदनाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच भास्कर कुलकर्णी यांनी मांडली.