मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रेस येत्या 20 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल नाना पटोले करणार आहेत.


मुख्यमंत्र्यांनी मोजरीपासून आपल्या महाजनादेश यात्रेची सुरुवात केली होती. नाना पटोलेही पोलखोल यात्रेची सुरुवात तिथून करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विकासाचे जे दावे केले ते किती खरे किती खोटे यासाठी ही पोलखोल यात्रा असणार आहे.


मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत विरोधकांना आव्हान दिले होते की, "त्यांनी चर्चा करावी राज्यात किती विकास झाला." हे आव्हान नाना पटोले यांनी स्वीकारलं होतं. पण त्याला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आता नाना पटोले राज्यात फिरणार आहेत. मुख्यमंत्री जिथे जाणार तिथे यात्रा काढत त्यांच्या भाषणातील मुद्द्यांची पडताळणी नाना पटोले करणार आहे.


मुख्यमंत्री नेहमी भाषण करताना आकड्यांमधून माहिती देतात, हा आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते करतात. त्यामुळेच सरकारने केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्षात झालेली काम, सरकारी आकडेवारी काँग्रेस या पोलखोल यात्रेतून जनतेच्या समोर मांडणार आहे.