OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं निवेदन भाजपतर्फे दिलं जातेय, हा भाजपचा ढोंगीपणा असल्याचे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीदेखील केंद्राकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागितला होता. भाजपने जर ओबीसींचा डेटा गोळा केला नाही, तर मग फडणवीस यांनी केंद्राला कोणता डेटा मागितला होता? असा सवालही भुजबळ यांनी केलाय. आम्हाला केंद्र सरकार तो डेटा देत नाही. ओबीसींचे आरक्षण थांबवण्यात भाजपचे लोक पुढे असल्याचा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. आमच्याकडे डेटा नाही असे केंद्र सरकार म्हणत आहे, हे साफ खोट असल्याचे भुजबळ म्हणाले.


भाजपचे सेक्रेटरी आमच्याविरुद्ध आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असे सांगत आहे. केंद्र सरकार ओबीसींच्या विरोधात कारस्थान रचत आहे. त्यांच्याकडे डेटा असतानाही देत नसल्याचे भुजबळ म्हणाले. केंद्र सरकार ओबीसींची कोंडी करतेय, मंत्र्याविरुद्ध खोट्या केसेस सुरू आहेत. राज्य सरकार ओबीसींच्या विरोधात आहे, असे चित्र केंद्र सरकारकडून उभे केलं जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. केंद्र सरकारने म्हणत आहे की राज्य सरकारने ओबीसींचा डेटा का गोळा केला नाही. गेल्या २ वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. सगळे घरी होते. अशात डेटा कधी गोळा करायचा असा सवालही भुजबळ यांनी केला. तसेच २०२१ ची जणगणना होणे गरजेचे होते, मात्र ती केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटामुळे केली नाही. अशात आम्हाला डेटा गोळा करा असे म्हणत आहेत. आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, आम्ही डेटा गोळा करण्याबाबचे काम करतो. आम्हाला वेळ देणे गरजेचे असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. आम्ही सगळी यंत्रणा कामाला लावून रात्रंदिवस एक करुन डेटा गोळा करु असे भुजबळ म्हणाले.


चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडतात


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रात भाजपचे सरकार आणखी 40-50 वर्ष सत्तेत राहिल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल छगन भुजबळ यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडतात, त्यांच्यावर किती बोलायचं असा खोचक टोला लगावला. महाराष्ट्रासह देशातील ओबीसी संकटात सापडलाय. हे भाजपने लक्षात ठेवावे. यामध्ये भाजपचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


ज्याच जळत त्यालाच कळत


ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वक्तव्य अल्पसख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. यावर भुजबळ यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, 'ज्याच जळत त्यालाच कळत अस वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. ज्याच्यावर अन्याय होईल तो आवाज उठवणारचं आहे. महाविकास आघाडी मजबूत आहेत. सरकारला कोणताही धोका नाही. थोडेफोर मतभेद होत असतात असे भुजबळ यावेळी म्हणाले. एका पक्षाचे सरकार असले तरी मतभेद होतात हे तर तीन पक्षांचे सरकार असल्याचं त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या :