जळगाव :  एसटी कर्मचाऱ्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. एस टी (ST) कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका असेही अजित पवार म्हणालेत. समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारने एवढा भार सहन करून  इतर राज्यांप्रमाणे पगार वाढ दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने दोन पावले मागे सरकायला हवे असे आवाहन अजित पवार यांनी केले.


जळगाव (Jalgaon) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भाष्य केले. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हट्ट योग्य नाहीत, त्यांनी आता दोन पावले मागे सरकायला हवे असे पवार यांनी यावेळी सांगितले. नवीन भरती केली तर अडचणीत वाढ होणार आहे. मागे एसटी कर्मचाऱ्यांना मानधन कमी होते हे मान्य आहे. मात्र, आता बऱ्यापैकी मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना वेळेतच पगार दिला जाणार असून, त्याला राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.


जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे कारण म्हणजे आमदारांना दिलेल्या निधी खर्च झाला का? त्यात काही अडचणी आहे का? याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच जिल्ह्यातील काही विषय मुंबईत जाऊनच सोडवावे असेही पवार म्हणाले. जर कोरोनाची तिसरी लाट आली तर तयारी काय करता येईल? याचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाचं जळगाव जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जळगाव येथील दौऱ्यात ते विविध विकास कामांच्या शुभारंभासह भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपसह अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्टया महत्व प्राप्त झाले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर अजित पवार हे प्रथमच जळगाव येत असल्याने एकनाथ खडसे यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत शक्ती प्रदर्शन केले आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या:


एससी, एसटीचेही आरक्षण संपवायचा भाजपचा अजेंडा : नवाब मलिक


मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र निधी मिळविण्यात शिवसेना पिछाडीवर, राष्ट्रवादीची चौपटीनं सरशी!