वंचित आणि एमआयएमची युती अखेर तुटली, असदुद्दीन ओवेसी यांचं शिक्कामोर्तब
विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं होतं.
हैदराबाद : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. इम्तियाज जलील यांनी घेतलेली भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलं आहे. हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी एमआयएम आणि वंचितच्या युतीबाबत भाष्य करत नाहीत, तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता ओवेसी यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने वंचित आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं होतं. समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
- ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत एमआयएमसोबत युती कायम : प्रकाश आंबेडकर
- तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, इम्तियाज जलील यांचं वंचित आघाडीला आव्हान
- एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार
- वंचितचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक : रामदास आठवले